लाच घेतांना ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यास पकडले
मोताळा : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता मिळवून देण्यासाठी लाच मागणार्या पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी पिंपळगाव राजा-मोताळा रोडवरील फुली फाटा येथे सापळा रचून करण्यात आली.
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन शत्रुघ्न इंगळे (वय ३३), कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, पंचायत समिती मोताळा, रा. उमरा ता. खामगाव जि. बुलढाणा यांनी तक्रारदाराकडे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचा दुसरा हप्ता ७० हजार रुपये मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंगळवार १५ एप्रिल रोजी सापळा कारवाई राबविण्यात आली. यावेळी पिंपळगावराजा ते मोताळा मार्गावरील फुली फाटा येथे आरोपी सचिन इंगळे यांना तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामगारांचे खरे उद्धार करते डॉ. बाबासाहेब आंबेडकर – प्रा. विशाल नंदागवळी






