नाशिकचे खरात प्रकरण
बुलढाणा https://buldhananews.in/
माजी मंत्री सुबोध सावजी Subodh Savji यांनी आपल्या पत्रात अत्याचाराच्या घटनांचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. त्यांच्या मते, एक प्रकार जबरदस्तीने घडणारा अत्याचार असून, दुसरा प्रकार महिलांकडून स्वेच्छेने घडवून घेतला जाणारा आहे. जबरदस्तीच्या घटनांमध्ये पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवलीच पाहिजे, असे त्यांनी नमूद केले आहे. मात्र, ज्या महिला स्वार्थासाठी किंवा आर्थिक लाभासाठी अशा प्रकारांमध्ये सहभागी होतात, त्यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी त्यांनी थेट राज्यपाल यांच्याकडे केली आहे.
याच पार्श्वभूमीवर सावजी यांनी सर्वात वादग्रस्त मागणी करताना म्हटले आहे की, अशा महिलांची नावे, फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण शासनाने सार्वजनिक करावे. त्यांच्या मते, अशा प्रकारे माहिती उघड केल्यास समाजात प्रतिबंधात्मक परिणाम होईल आणि भविष्यात अशा घटना कमी होतील. समाजासमोर सत्य येणे आवश्यक आहे, असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
राज्यातील राजकारणात सध्या एक अत्यंत वादग्रस्त मुद्दा चर्चेत आला असून, माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या विधानांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अत्याचाराच्या प्रकरणांबाबत सावजी यांनी थेट राज्यपालांना पत्र पाठवत काही धक्कादायक मागण्या मांडल्या आहेत. त्यांच्या या पत्रामुळे सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर स्तरांवर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच, सावजी यांनी भोंदू बाबा, तथाकथित संत किंवा आर्थिक प्रलोभनांच्या आहारी जाऊन काही महिला अशा घटनांमध्ये सहभागी होतात, असा आरोप केला आहे. सध्याच्या कायद्यानुसार कोणत्याही अत्याचार प्रकरणातील पीडितेची ओळख उघड करणे आणि संबंधित व्हिडिओ प्रसारित करणे हा गुन्हा मानला जातो. मात्र, हीच कायदेशीर चौकट बदलण्याची गरज असल्याचे सावजी यांनी आपल्या पत्रात मांडले आहे.
दरम्यान, या पत्रामुळे राज्यातील महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञांमध्ये संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे. अनेकांच्या मते, अशा प्रकारची मागणी ही महिलांच्या गोपनीयतेवर, सन्मानावर आणि सुरक्षिततेवर गंभीर आघात करणारी ठरू शकते. तसेच, यामुळे पीडित महिलांना न्याय मिळवण्यासाठी पुढे येण्यासही अडथळे निर्माण होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
राजभवनाकडून अद्याप या पत्रावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, सावजी यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून, विरोधकांकडून सरकारला लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.
एकूणच, या प्रकरणामुळे कायदा, समाज आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांमध्ये मोठा वाद निर्माण होवून येत्या काही दिवसांत या विषयावर व्यापक चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोमवार बुलढाणा जिल्हा दौर्यावर






