मी घेत आहे ९० हजार रुपये मानधन शासन तिजोरीत जमा करण्याचा निर्णय आपणही घ्यावा
अपात्र सरपंच करू शकतो तर चिखलीच्या आमदारांनीही करावे : मनोज लाहूडकर
चिखली मतदारसंघाच्या आमदारांनीही त्यांच्या आतापर्यंतच्या साडेसात वर्षाच्या कारकीर्दीचे (९० महिन्यांचे) ३ लाख १ हजार रुपये महिना याप्रमाणे २ कोटी ७० लाख ९० हजार रुपये मानधन शासन तिजोरीत जमा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन अपात्र सरपंच मनोज लाहुडकर यांनी केले.
एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले आहे की, आमदार श्वेताताई महाले यांनीच मला अपात्र सरपंच केलेले आहे. आता मी पात्र आहे की नाही हे न्यायालयच सांगेल. तरी मी अपात्र सरपंच असूनही देशहितासाठी माझे मानधन शासनाकडे जमा करत आहे. राज्यातल्या इतर आमदारांना आवाहन करायला माझी एवढी मोठी उंची नाही. मात्र आमच्या लोकप्रतिनिधी असलेल्या चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांना आवाहन करणे, हे मतदारसंघातील एक नागरिक म्हणून मी कर्तव्य समजतो. सामान्य जनतेला काटकसरीचे सल्ले देणार्या आमदारांनी आधी स्वतःच्या मानधनाचा त्याग करावा. जनतेवर महागाई, बेरोजगारी आणि इंधन दरवाढीचा भडका उडाला असताना लोकप्रतिनिधींनी गप्प बसून चालणार नाही, असेही मनोज लाहुडकर म्हणाले.
देशावर आर्थिक संकटाचे सावट असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशवासियांना इंधन बचत, अनावश्यक खर्च टाळणे आणि संसाधनांचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर उदयनगरचे अपात्र सरपंच मनोज लाहूडकर यांनी ३ हजार रुपये महिना प्रमाणे अडीच वर्षांचे ९० हजार रुपये मानधन शासन तिजोरीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या निर्णयाची माहिती देताना मनोज लाहूडकर म्हणाले की, देश आर्थिक अडचणीच्या काळातून जात असताना लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेऊन शासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. मी अपात्र सरपंच असूनही अडीच वर्षांचे मानधन शासनाकडे जमा करण्याचा निर्णय घेतला. मग चिखली मतदारसंघाच्या आमच्या आमदारांनीही त्यांच्या आतापर्यंतच्या साडेसात वर्षाच्या कारकीर्दीचे ( ९० महिन्यांचे ) ३ लाख १ हजार रुपये महिना याप्रमाणे २ कोटी ७० लाख ९० हजार रुपये मानधन शासन तिजोरीत जमा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन त्यांनी केले.
मनोज लाहूडकर म्हणाले की, आमच्या मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींनी देशहितासाठी पुढे येत त्यागाची भूमिका घ्यावी. आमदार श्वेताताई महाले यांनी आपले आतापर्यंतचे २ कोटी ७० लाख ९० हजार रुपये असे संपूर्ण मानधन शासन तिजोरीत जमा करून त्याचे दस्तऐवज व समाजमाध्यमांवर जाहीर करावेत. त्यांनी असे केल्यास त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षावरील निष्ठा सिद्ध होईल.
काय सांगता… अमरावतीकरांची २५ मे रोजी ५२ सेकंद सावली होणार गायब
डिझेल उपलब्ध न झाल्यास शेतकरी शेती पेरणार नाही; शेतकरी संघटनेचा इशारा







