डेहराडून : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी Leader of the Opposition in the Lok Sabha, Rahul Gandhi यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या दहा वर्षांत देशभरात १५२ पेपरफुटीच्या घटना घडल्या असून त्याचा साडेसात कोटी विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर थेट आणि विपरीत परिणाम झाल्याचा दावा त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, ही केवळ प्रशासकीय चूक नसून देशाच्या परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर बाब आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाते आणि त्यांच्या भविष्यासोबत खेळ केला जातो, असे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणांमध्ये आजपर्यंत एकाही दोषीला कठोर शिक्षा झालेली नाही, ही अत्यंत लज्जास्पद बाब असल्याची टीकाही त्यांनी केली. या आकडेवारीवरून देशातील परीक्षा यंत्रणा पूर्णपणे खिळखिळी झाली असून केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालय याबाबत अपयशी ठरल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि परीक्षांची विश्वासार्हता टिकवण्यासाठी सरकारने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.






