शिवसेनेची ताकद वाढवण्याची जबाबदारी आता बच्चू कडूंवर…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची राजकीय खेळी
मुंबई:
प्रहारच्या मतांमुळे बदलू शकते समीकरण २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने ३८ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्या निवडणुकीत पक्षाला सुमारे १.५५ टक्के मते मिळाली होती. आता कडू शिंदे गटासोबत आल्याने विदर्भातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, २०१७ मध्ये नागपूर ते गुजरातमधील वडनगरपर्यंत काढलेली बच्चू कडू यांची आसूड यात्रा राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे विदर्भात त्यांची संघटनात्मक ताकद आणि जनाधार लक्षात घेता, आगामी काळात महायुतीतील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होऊ शकतो.
महायुतीतील अंतर्गत हालचाली आणि ऑपरेशन टायगर च्या चर्चांदरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले बच्चू कडू यांच्यावर शिंदेंनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून, त्यांची शिवसेनेच्या विदर्भ विभागीय नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटन, शाखा बांधणी आणि ग्रामीण भागात शिवसेनेची ताकद वाढवण्याची जबाबदारी आता बच्चू कडूंवर असणार आहे. बच्चू कडू यांनी अलीकडेच एकनाथ शिंदे यांचं जोरदार कौतुक करत, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत, असं विधान केलं होतं.
आजही सर्वेक्षण झालं तर लोक पुन्हा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री म्हणून पसंती देतील, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर महायुतीत राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. कडू यांनी शिंदेंच्या कार्यशैलीचं कौतुक करत, ते रात्री दोन वाजताही सामान्य लोकांसाठी उपलब्ध असतात, असंही म्हटलं होतं. विदर्भ हा पारंपरिकरित्या भाजप आणि काँग्रेसचा मजबूत गड मानला जातो. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला या भागात मोठं यश मिळालं होतं; मात्र आता शिंदे गटाकडून स्वतंत्रपणे विदर्भात पक्ष विस्तारावर भर दिला जात असल्याने भाजपचं टेन्शन वाढण्याची चर्चा सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यातून राजकारण करणारे बच्चू कडू हे विदर्भातील आक्रमक आणि जनसामान्यांमध्ये लोकप्रिय नेते मानले जातात. शेतकरी, दिव्यांग आणि स्थानिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. दिव्यांगाचे मसीहा अशी त्यांची ओळख असून ग्रामीण भागात त्यांचा मोठा प्रभाव असल्याचं मानलं जातं.
बुलढाणा जिल्ह्यातील पहिल्या महिला मानद वन्यजीव रक्षक म्हणून डॉ.वैशाली निकम ह्यांची निवड व सन्मान
भाजपमध्ये प्रवेश केला अन्… २८ माध्यमिक शाळांवर अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका







