खामगाव रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे तातडीने नियमितीकरण करून शासकीय निधीतून सौंदर्यीकरण करावे तसेच खामगाव येथील व्यापारी संकुलाला डॉ.अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुल नाव देण्यात यावे या मागणीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारक समिती व मातंग समाजाच्या वतीने सोमवारी, २३ मार्च २०२६ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी (महसूल) यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खामगाव रेल्वे स्टेशन परिसरात मातंग समाजाचे आराध्य दैवत असलेले अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा अनेक वर्षांपासून उभा आहे. मात्र, या पुतळ्याचे अधिकृत नियमितीकरण व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. यासाठी नगर परिषद व संबंधित विभागाकडे वारंवार मागण्या करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, नगर परिषद खामगावच्या माध्यमातून उभारण्यात येणार्या व्यापारी संकुलाला डॉ. अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुल असे नाव देण्यात यावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी स्थायी समितीमार्फत प्रस्ताव मंजूर करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सदर पुतळा ज्या ठिकाणी उभारण्यात आला आहे, त्या जागेबाबत कोणताही वाद नसून भविष्यातही वाद निर्माण होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही अडचण न आणता मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला आहे. उद्भवणार्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी नगर परिषद प्रशासनावर राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर परिमल कांबळे (दादा), आशिष सावळे, संभाजी शिंदे (नाना), लखन अवचार, कृष्णा नाटेकर, आशिष खंडारे, गोपाल वानखडे, गजानन सोनोने आदींची स्वाक्षरी आहे.






