महादेव मंदिराच्या परिसरातून मानाच्या बैलजोडीच्या भव्य मिरवणूक
चिखली शहराचे आराध्य दैवत असलेल्या कुलस्वामिनी श्री. रेणुका माता देवीच्या वासंतिक नवरात्र उत्सवाला मंगळवार, २४ मार्च पासून सुरुवात होत आहे. त्याअनुषंगाने मंदिर कमिटी सज्ज झाली आहे.
यासाठी यात्रा आणि विविध धार्मिक कार्यक्रमासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. या वासंतिक नवरात्र उत्सवाची सुरुवात आज सकाळी शहरातील महादेव मंदिराच्या परिसरातून मानाच्या बैलजोडीच्या भव्य मिरवणुकीने होणार आहे. दि. २५ मार्च रोजी घटस्थापना होऊन दररोज सकाळी व सायंकाळी महाआरती आणि जागर रेणुका माऊलीचा या संकल्पनेतून भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार, २६ मार्च रोजी रामनवमी निमित्त हभप राजेंद्र तळेकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. तर शुक्रवार, २७ मार्च रोजी श्री स्वामीनारायण जयंती निमित्त भजन आणि भक्ती संगीत तसेच २८ व २९ मार्च रोजी भजन, गीतापाठ आणि फराळाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, ३० मार्च रोजी शिवलीलामृत वाचन तर, मंगळवार, ३१ मार्च रोजी खामगाव चौफुली येथे हभप शिवाजी शिंदे महाराज (आळंदी देवाची) यांचे कीर्तन आणि ध्वज पूजन आणि १ एप्रिल रोजी हभप राणी दौंड महाराज यांचे कीर्तन व पारंपारीक मशाल मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या वासंतिक नवरात्र उत्सवाची सांगता दि.२ एप्रिल २६ रोजी हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक विधी नंतर सायंकाळी ६ वाजता श्री रेणुका देवीची अष्टभुजा प्रतिमेची बैलगाडीवर भव्य वहन मिरवणुकीला सुरुवात होऊन दुसर्या दिवशी ३ एप्रिल रोजी सकाळी मंदिरात पोहचेल. या वहन मिरवणुकीत पंजाब येथील दिलेर खालसाच्या पथकासह वाघ्या मुरळी, ठिकठिकाणी बारुद खाना यांचे आकर्षण राहणार आहे.






