चिखली शहरात बांधकामावर काम करत असताना थ्री- फेज वीजतारांवर पडून ५५ वर्षीय मिस्त्रीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शहरातील गजानन नगर परिसरात सोमवार, ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ही घटना घडली. अमजद खा युसूफ खा (रा. इंदिरा नगर,चिखली) असे या मिस्त्रीचे नाव आहे.
सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अमजद खा हे दुसर्या मजल्यावर पालकावर उभे राहून सेंट्रिंग प्लेट लावत होते. यावेळी अचानक टी -प्लेट खाली घसरली आणि त्यांचा तोल जाऊन ते थेट बांधकामाला लागून असलेल्या उघड्या थ्री फेज वीजतारांवर कोसळले. या धक्कादायक घटनेत ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर नागरिकांनी तातडीने त्यांना पानगोळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राण ज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप होत आहे.







