गॅस सिलेंडरसाठी लोकांचे जीव जाण्याची वेळ
अकोला: गॅससारख्या मूलभूत गरजेसाठी लोकांना तास्नतास रांगेत उभे राहावे लागत असेल तर ही दुर्दैवी गोष्ट असून गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्याने एका निष्पाप नागरिकाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाठ (वय अंदाजे ५५) यांचा गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे असताना मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
प्राप्तमाहितीनुसार शंकरराव सिरसाठ हे काल सकाळी ९ वाजता गॅस सिलेंडर घेण्यासाठी स्थानिक गॅस एजन्सीसमोर रांगेत उभे होते. मात्र, प्रचंड उन्हात आणि वाढत्या गर्दीत उभे राहिल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर आली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
शासनाने योग्य नियोजन केले नाही – राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शासनाच्या नियोजनशून्यतेवर कठोर शब्दांत टीका केली. गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. तरीही शासनाने योग्य नियोजन केले नाही. वेळेवर उपाययोजना केल्या असत्या, तर शंकरराव सिरसाठ यांचा जीव वाचू शकला असता, असे त्यांनी म्हटले. तसेच, त्यांनी केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवत, गॅस सिलेंडरसाठी लोकांचे जीव जाण्याची वेळ येऊ नये. यासाठी तात्काळ ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने जबाबदारीने काम करावे, अशी मागणी केली. प्रशासनानेही या घटनेची दखल घेत आवश्यक ती कारवाई करावी, अशी अपेक्षा राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.







