best news portal development company in india

भाजपमध्ये प्रवेश केला अन्… २८ माध्यमिक शाळांवर अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका

SHARE:

नाशिक जिल्ह्यातील नामवंत शिक्षण संस्था असलेल्या महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेला राज्य सरकारने मोठा धक्का दिला आहे. संस्थेच्या तब्बल २८ माध्यमिक शाळांवर अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवत शिक्षण संचालकांनी प्रशासक नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. ही संस्था माजी मंत्री प्रशांत हिरे यांची असून, त्यांचे सुपुत्र अपूर्व आणि अद्वय हिरे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने ही कारवाई राजकीय आकस आणि दबावातून झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः नाशिकचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे व हिरे कुटुंबियातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत असल्याने, या कारवाईला राजकीय वळण मिळाले आहे.  जिल्ह्यातील दुसर्‍या क्रमांकाच्या मोठ्या संस्थेवर अशा प्रकारे घाऊक पद्धतीने प्रशासक नेमण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कारवाईमुळे संस्थेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला असून, आगामी काळात हे प्रकरण न्यायालयीन लढाईत जाण्याची दाट शक्यता आहे.

माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या कुटुंबियांच्या अधिपत्याखालील या संस्थेवरील कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने या शाळांची धडक चौकशी केली होती. या चौकशी अहवालात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या. यामध्ये संच मान्यतेसाठी कागदोपत्री जास्त विद्यार्थी दाखवून अतिरिक्त शिक्षक पदे मंजूर करून घेणे, प्रत्यक्षात विद्यार्थी उपस्थिती कमी असतानाही अधिक उपस्थिती दाखवून शालेय पोषण आहाराचा निधी लाटणे, शिक्षक एका शाळेत कार्यरत असताना त्यांचे वेतन दुसर्‍या शाळेतून काढले जाणे, शाळांमधील भौतिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत व्यवस्थापनाची उदासीनता असणे या प्रमुख त्रुटी आढळून आल्या होत्या. शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सुनावणीनंतर हा आदेश दिला असून, प्रशासकाचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी असेल.

Sadhna Thorat
Author: Sadhna Thorat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *