ढोरखेडा सरपंच सुनीता मिटकरीला लाच स्वीकारतांना अटक
जेव्हा सत्तेच्या खुर्चीवर बसलेले लोकच आदर्शच्या नावाखाली लाचखोरी करत असतील, तर सामान्यांनी न्याय मागावा तरी कोणाकडे? प्रशासनाने दिलेला हा पुरस्कार की भ्रष्टाचाराची पोचपावती आहे का? हा प्रश्न आता ढोरखेडा ग्रामस्थ आणि सर्वसामान्य जनता विचारत आहे. हा भ्रष्टाचार केवळ एक गुन्हेगारी कृत्य नसून, गावाच्या विकासाच्या नावावर गोरगरिबांच्या स्वप्नांशी केलेला विश्वासघात आहे. या घटनेने ढोरखेडाच्या विकासाच्या दाव्यातील फोलपणा उघड केला असून, भ्रष्टाचाराच्या या आदर्शाचे डोळ्यात अंजन घालणारे वास्तव समोर आले आहे.
बुलढाणा न्यूज
एकीकडे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावाला आदर्श म्हणून गौरवण्याची प्रक्रिया सुरू होती, तर दुसरीकडे त्याच आदर्श ग्रामपंचायतीची सरपंच भ्रष्टाचाराच्या दलदलीत हात धुवून घेत होती. मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा येथील सरपंच सुनीता दत्तात्रय उर्फ बबन मिटकरी यांना ४ जून २०२६ रोजी दुपारी ४ वाजता, २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वाशिम एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) च्या पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईने आदर्श ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या काळ्याकुट्ट वास्तवावर प्रकाश टाकला आहे. ढोरखेडा ग्रामपंचायतीमध्ये ४.५ लाख रुपयांचे नाली बांधकामाचे बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात सरपंच सुनीता दत्तात्रय उर्फ बबन मिटकरी यांनी १० टक्के लाचेची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराची धावपळ सुरू असताना अखेर २५ हजार रुपयांवर तडजोड झाली. तक्रारदाराने याबाबत वाशिम एसीबीकडे धाव घेतली होती. ३ जून रोजी एसीबीने या तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी स्पष्ट झाली आणि ४ जून रोजी सापळा रचून सरपंच मिटकरी यांना लाचेची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली.
या घटनेने प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे, ज्या दिवशी एसीबीने या प्रकरणाची पडताळणी गुरुवार, दि.३ जून २०२६ केली, त्याच काळात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील एक चमू ढोरखेडा येथे कामकाजाची तपासणी करत होती. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे या गावाला आदर्शचा दर्जा देऊन तपासणी केली जात होती. एका बाजूला गावाच्या विकासाचे आदर्श मोजमाप सुरू होते, तर दुसरीकडे सरपंच भ्रष्टाचारात लिप्त होत्या, हा किती मोठा विरोधाभास आहे! आदर्श सरपंच म्हणून मिरवणार्यांनी जनतेच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणे, हे कोणत्या विकासाचे आदर्श आहेत? प्रशासनाने दिलेला हा पुरस्कार की भ्रष्टाचाराची पोचपावती? हा प्रश्न आता ढोरखेडा ग्रामस्थ आणि सर्वसामान्य जनता विचारत आहे. हा भ्रष्टाचार केवळ एक गुन्हेगारी कृत्य नसून, गावाच्या विकासाच्या नावावर गोरगरिबांच्या स्वप्नांशी केलेला विश्वासघात आहे. या घटनेने ढोरखेडाच्या विकासाच्या दाव्यातील फोलपणा उघड केला असून, भ्रष्टाचाराच्या या आदर्शाचे डोळ्यात अंजन घालणारे वास्तव समोर आले आहे. आता या भ्रष्ट कारभारावर कोणती कडक कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







