राष्ट्रीय पोर्टलवर लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करावी
कमलेश हिवाळे
देऊळगावराजा – प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन व सन २०२४-२५ मध्ये उद्दिष्ट मिळालेल्या राज्य पुरस्कृत आवास योजना अंतर्गत लाभार्थ्यांच्या घरावर सौर यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलून प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर एक किलो वॅट मर्यादेपर्यंत सौर यंत्रणा उभारणी करिता केंद्र शासनाकडून तीस हजार रुपये तर राज्य शासनाकडून १५ हजार रुपये मिळणार आहेत, असे गटविकास अधिकारी मुकेश माहोर यांनी सांगितले.
सदर योजनेचे उद्दिष्ट लाभार्थ्यांच्या घरावर सौर यंत्रणापासून वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे, वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत निर्माण करून देणे. तसेच छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे महावितरणाचे विद्युत जोडणी असणे आवश्यक आहे तदनंतर पीएम सूर्य घर च्या संकेतस्थळाला भेट देऊन राष्ट्रीय पोर्टलवर लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर महावितरण मार्फत पडताळणी करून करून घ्यावे लागते. त्यानंतर विक्रेत्याकडून घरावर सौरसंच स्थापित केला जातो सदर प्रक्रिया ही ऑनलाइन असून यात विक्रेता लाभार्थ्यांना प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करतो.
तसेच याप्रकरणी सूर्यघर योजनेअंतर्गत सौरसंच स्थापित करण्याकरता येणारा खर्च हा अगोदर करावा लागतो व त्यानंतर अनुदान प्राप्त होते. सौर संच बसवण्यासाठी आधार कार्ड, नमुना नंबर आठ, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे. प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन व २०२४-२५ मधील राज्य पुरस्कृत आवास योजनामधील लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना मोफत व अखंडित वीजपुरवठा होण्यास मदत होईल, असे गटविकास अधिकारी मुकेश माहोर व विस्तार अधिकारी गजानन म्हस्के यांनी सांगितले.






