best news portal development company in india

डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ २० जुलैला महाराष्ट्रभर २४ तास वैद्यकीय सेवा बंद

SHARE:

वैद्यकीय सेवा बंद ठेवून राज्यव्यापी ‘मेडिकल सर्व्हिसेस शटडाऊन’

ओपीडी व नियोजित शस्त्रक्रिया ठप्प; आपत्कालीन, आयसीयू व प्रसूती सेवा सुरूच – आयएमएचा इशारा

अमरावती- डोंबिवली येथील शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हिंसक हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्य शाखेने सोमवार, २० जुलै रोजी सकाळी ६ ते मंगळवार, २१ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत राज्यभर २४ तास नियमित वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

या आंदोलनादरम्यान सर्व नियमित ओपीडी सेवा, नियोजित शस्त्रक्रिया आणि इतर नियमित वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत. मात्र आपत्कालीन सेवा, आयसीयू, प्रसूती विभाग तसेच जीवनावश्यक उपचार पूर्ववत सुरू राहतील, असे आयएमएने स्पष्ट केले आहे.

या आंदोलनात अ‍ॅलोपॅथीसह आयुर्वेद, होमिओपॅथी आणि इतर वैद्यकीय शाखांतील डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी तसेच विविध आरोग्य संघटना सहभागी होणार आहेत.

आयएमएने स्पष्ट केले की, हा निर्णय रुग्णांच्या विरोधात नसून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित व सन्मानजनक कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी घेतला आहे. “आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा म्हणजेच सुरक्षित रुग्णसेवा” असा ठाम संदेश संघटनेने दिला आहे.

संघटनेने राज्य शासनाकडे डोंबिवली प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई, मेडिकेअर सेवा संरक्षण कायद्यात प्रभावी सुधारणा, रुग्णालयांमध्ये २४ तास सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही व प्रवेश नियंत्रण, फास्ट ट्रॅक न्यायालयांमार्फत खटल्यांचा निपटारा तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार रोखण्यासाठी कठोर केंद्रीय कायदा करण्याची मागणी केली आहे. याशिवाय सरकारी रुग्णालयांसाठी अर्थसंकल्पीय तरतूद वाढविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

आयएमएने इशारा दिला आहे की, शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास ९ ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्रभर बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल. आवश्यकतेनुसार संपूर्ण वैद्यकीय सेवा बंद ठेवून राज्यव्यापी ‘मेडिकल सर्व्हिसेस शटडाऊन’ करण्यात येईल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

Buldhana News
Author: Buldhana News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

best news portal development company in india
और देखें