भूसंपादन, पुनर्वसन व कालव्यांच्या कामांचा आढावा; सिंचन क्षमता वाढीसाठी प्रभावी नियोजनावर भर
बुलढाणा- राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी शुक्रवारी जिगाव धरण प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. प्रकल्पाची उर्वरित सर्व कामे गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि निश्चित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी आमदार चैनसुख संचेती, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, जिगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता परमजित सिंग जुनेजा, प्रवीण चावरे, गणेश हासे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.
कार्यकारी अभियंता परमजित सिंग जुनेजा यांनी धरणाची सद्यस्थिती, जलसाठा क्षमता, सुरू असलेली कामे, भूसंपादन, पुनर्वसन प्रक्रिया तसेच कालव्यांच्या उभारणीची प्रगती याबाबत माहिती दिली. प्रकल्पाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रभावी नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
धरण परिसराची पाहणी करताना सहपालकमंत्री सावकारे यांनी प्रकल्पाशी संबंधित तांत्रिक बाबींची माहिती घेतली. धरण क्षेत्रातील भूसंपादन व पुनर्वसनाची कामे गतीने पूर्ण करावीत, पुनर्वसनासाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करावा आणि सिंचन क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी सावकारे म्हणाले, जिगाव धरण प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर परिसरातील हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे कृषी उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. प्रकल्पाची सर्व कामे वेळेत व उच्च दर्जाने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.






