सुषमा अंधारे, जयश्री शेळके यांनी आंदोलनस्थळी भेट देत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी लढा तीव्र
नवी दिल्ली : शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या उपोषणाच्या १९ व्या दिवशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना दोन्ही नेत्यांनी शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास अबाधित ठेवण्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
जयश्री शेळके यांनी सध्याच्या व्यवस्थेवर तीव्र टीका करत म्हटले की, “देशात सर्वात मोठा पराभव शत्रूकडून होत नाही, तर तो स्वतःच्या व्यवस्थेकडून होतो. जेव्हा प्रश्नपत्रिका फुटतात, गुणवत्ता हरते, मेहनतीचे मोल संपते आणि सरकार केवळ सत्ता टिकविण्यात व्यस्त राहते, तेव्हा केवळ विद्यार्थीच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचे भविष्य धोक्यात येते.”
सुषमा अंधारे यांनी देशातील विविध परीक्षा घोटाळ्यांचा उल्लेख करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान Union Education Minister Dharmendra Pradhan यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. सरकार या प्रकरणात ठोस भूमिका घेत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशभरातून सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पक्षांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे अंधारे यांनी सांगितले. मात्र, काही अपवाद वगळता मुख्य प्रवाहातील माध्यमांकडून या आंदोलनाला अपेक्षित प्रसिद्धी मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व शिवसैनिक सक्रियपणे सहभागी राहतील आणि आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा देतील, अशी भूमिका सुषमा अंधारे आणि जयश्री शेळके यांनी स्पष्ट केली. देशातील युवकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा घडवून आणण्यासाठी हा लढा निर्णायक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.







