स्वयंघोषित घोषणा पत्रावर जीवंत आईच्या मृत्यूची खोटी नोंद
मुलाने बँक खात्यातील दहा लाख हडपले; गुन्हा दाखल
बुलढाणा न्यूज
जळगाव जामोद : मुलानेच स्वयंघोषित घोषणा पत्रावर जीवंत आईच्या मृत्यूची खोटी नोंद करत नगर परिषदेतून प्रमाणपत्र मिळवून त्यानंतर बँक खात्यातून तब्बल १० लाख रूपयांची रक्कम लंपास केली. घटनेनंतर मुलगा आईला वार्यावर सोडून पसार झाला आहे. एकुलता एक असणार्या मुलाने जन्मदात्रीसोबत असा कारनामा केल्याने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जामोद नगर परिषदेत कुठलीही शहनिशा न करता मुलाला जीवंत वृद्ध आईचं मृत्यू प्रमाणपत्र दिले, आणि याच मुलाने आईच्या खात्यात जमा असलेले १० लाख रुपये उडवले व आपल्या जीवंत आईला रस्त्यावर सोडून पसार झाला. ही धक्कादायक घटना जळगाव जामोद शहरात नुकतीच उघडकीस आली.
प्रेमसिंह कमलसिंह राजपूत या व्यक्तीने आपली आई दि.५ ऑक्टोबर २०२३ रोजी मृत्यू पावल्याचे स्वयंघोषणापत्र दि.२३ नोव्हेंबर २०२३ रोजी जळगाव जामोद नगर परिषदेत देऊन आईच्या मृत्यूची नोंद केली. जळगाव जामोद नगर परिषदेतील कर्मचार्यांनी कुठलीही शहनिशा न करता जीवंत वृद्धेच्या मृत्यूची नोंद करून तसे प्रमाणपत्र ही या मुलाला देऊन टाकले. प्रेमसिंह राजपूत याने आपल्या आईच्या मृत्यूच्या प्रमाणपत्राच्या आधारे आईच्या खात्यात ठेव म्हणून जमा असलेले दहा लाख रुपये बँकेतून काढून पसार झाला. ही बाब ज्यावेळी जीवंत असलेल्या कौशल्याबाई राजपूत यांना माहिती पडली तेव्हा त्यांनी नगर परिषदेत स्वतःच्याच मृत्यूचे प्रमाणपत्रासाठी स्वतःच्या नावाने अर्ज केला व विशेष म्हणजे नगर परिषदेने हे प्रमाणपत्र ही कौशल्याबाईंना जीवंत असताना मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकले.
स्वतःचे घर विकून बँकेत १० लाख रुपये ठेवलेल्या कौशल्याबाईचे एकाकी जीवन
पंच्याहत्तर वर्षीय कौशल्याबाई यांनी बँकेत चौकशी केली असता बँकेतील दहा लाख रुपये त्यांचा मुलगा प्रेमसिंह याने काढून पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यावेळेस कौशल्याबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. कौशल्याबाई या आता एकट्याच एकाकी जीवन जगत असून मी जीवंत आहे असे त्यांना आपल्या मृत्यूचे प्रमाणपत्र घेऊन पोलीस स्टेशनच्या चकरा माराव्या लागल्या. या प्रकरणी दोन महिन्यापूर्वी तक्रार देऊनही अद्याप पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याचा आरोप कौशल्याबाईंनी केला आहे. विशेष म्हणजे स्वतःच्या मृत्यूचे प्रमाणपत्र जळगाव जामोद नगर परिषदेकडे जीवंतपणी मागण्याची वेळ कौशल्याबाईंवर आली. या संपूर्ण प्रकरणामुळे आता स्वतःचे घर विकून बँकेत दहा लाख रुपये ठेवलेल्या कौशल्याबाई या एकाकी जीवन जगत असून त्यांना कुणाचाही सहारा उरलेला नाही. मात्र या सगळ्या प्रकारामुळे नगर परिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.




